परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावरील गुन्ह्याचा निषेध केल्या जाणार असल्याची माहिती आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांनी दिली.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी व शहर जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी परभणीतील पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - पाथरी तालुक्यात पुराच्या पाण्यात वाहून गेला शेतकरी; बंधाऱ्याला अडकल्याने वाचले प्राण
पुढे बोलतांना बाबाजानी दुर्रानी म्हणाले, गेल्या 55 वर्षांपासून राजकारणात असलेल्या शरद पवारांवर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. अनेक प्रकरणांचे त्यांच्यावर आरोप झाले. मात्र, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध होऊ शकलेला नाही. शिवाय या प्रकरणात ते बँकेचे संचालक नसतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे, ही दुर्दैवाची बाब आहे. सत्ताधारी पक्षांकडून सूडबुद्धी चे राजकारण होत असून याचा आम्ही निषेध करत आहोत.
हेही वाचा -परभणीमध्ये विवाहितेची गळफास लावून आत्महत्या
त्यासाठी गुरुवारी परभणी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय बंद ठेवून या प्रकाराचा निषेध करण्यात यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जाणार असल्याचेही दुर्रानी म्हणाले. दरम्यान, सध्या आचारसंहिता चालू असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आंदोलन कितपत यशस्वी होते, हे गुरूवारी दिसून येणार आहे.