महाराष्ट्र

maharashtra

परभणीच्या लोकन्यायालयात 721 प्रकरणे निकाली, 9 कोटी वसूल; व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही निवाडा

By

Published : Dec 13, 2020, 9:45 AM IST

Updated : Dec 13, 2020, 10:20 AM IST

परभणीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामाध्यमातून नागरिकांची प्रकरणे निकाली करण्यात आली. व्हाट्सअॅपच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वादग्रस्त प्रकरणांचाही निकाल लावण्यात आला आहे.

परभणीच्या लोकन्यायालयात 721 प्रकरणे निकाली
परभणीच्या लोकन्यायालयात 721 प्रकरणे निकाली

परभणी- येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने शनिवारी जिल्हा न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या 'राष्ट्रीय लोकअदालत' या उपक्रमात तब्बल 721 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तर विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेले 8 कोटी 86 लाख रुपयांची रक्कम देखील वसूल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या लोकन्यायालयात 'व्हिडिओ कॉलिंग' च्या माध्यमातून अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तब्बल 9 महिन्यानंतर लोकअदालत आयोजित झाल्याने त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

'व्हिडिओ कॉलिंग'च्या माध्यमातून न्यायनिवाडा -न्यायाधीश शेख'

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन-

परभणीच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे परभणी न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि.वि. बांबर्डे यांच्या हस्ते झाले. सदरील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सर्व प्रकारची तडजोडपात्र, फौजदारी व भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१, बॅक वसूली, मोटार अपघात, कौटुंबिक वाद, कामगारांची प्रकरणे, भू-संपादन, वीज प्रकरणे (चोरीची प्रकरणे वगळून) व पाणी आकार प्रकरणे, वेतन व भत्त्यांची सेवा विषयक, महसूल आणि दिवाणी स्वरूपांची इतर प्रकरणे तसेच बँकेची वसुली वादपुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती.

'व्हिडिओ कॉलिंग'च्या माध्यमातून न्यायनिवाडा -न्यायाधीश शेख'

या लोकन्यायालयात व्हाट्सअॅपच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वादग्रस्त प्रकरणांचा निकाल लावण्यात आला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यापुढे भविष्यात देखील अशा पद्धतीने वादग्रस्त प्रकरणांचा निकाल लावता येऊ शकतो, याचा पायंडा आजच्या या लोकअदालतिच्या माध्यमातून पडला आहे. त्यामुळे लोकांना न्यायालयात त्यांची प्रकरणे सोडविण्यासाठी येण्याची गरज नाही, असे मत लोकअदालतीचे संयोजक तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश एफ.के.शेख यांनी व्यक्त केले.

'दिवाणी, फौजदारी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात तडजोडी'

या उपक्रमात गेले कित्येक महिने आणि वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दिवाणी आणि फौजदारी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात तडजोडी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 433 प्रकरणे समन्वय घडवून निकाली काढण्यात आले. या माध्यमातून तब्बल 7 कोटी 15 लाख 99 हजार 589 रुपयांची वसुली देखील झाली आहे. याप्रमाणेच वादपूर्व दाखल असलेल्या 288 प्रकरणांचा देखील निकाल लावण्यात आला आहे. ज्यामध्ये 1 कोटी 70 लाख 3 हजार 397 रुपये देखील वसूल करण्यात आले आहेत. आज या लोक न्यायालयाच्या माध्यमातून एकूण 721 प्रकरणे निकाली निघाली असून, ज्या माध्यमातून एकूण 8 कोटी 86 लाख 2 हजार 986 रुपयांची वसुली झाल्याची माहिती देखील न्यायाधीश एफ.के.शेख यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड.राजेश चव्हाण, ॲड. डी.यु. दराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी कण्यासाठी परभणी येथील न्यायीक अधिकारी, सदस्य, वकील संघ, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकारांनी मेहनत घेतली.

Last Updated : Dec 13, 2020, 10:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details