परभणी- गेल्या दहा वर्षात 'एमआयएम'ने परभणी जिल्ह्यात विविध निवडणुका लढवल्या, अगदी विधानसभेत दुसऱ्या स्थानी राहिलेल्या एमआयएमला आतापर्यंत यश कुठेच मिळाले नव्हते. परंतु रविवारी परभणी महापालिकेच्या २ प्रभागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत त्यांनी आपले पहिले खाते उघडले आहे. पालिकेच्या प्रभाग क्र. ११ मधील पोट निवडणुकीचा सोमवारी निकाल जाहीर झाला असून यात एमआयएमच्या अब्दुल फातेमा अब्दुल जावेद यांचा विजय झाला. तर प्रभाग क्र. ३ मध्ये राष्ट्रवादीच्या गौळणबाई रोडे या विजयी झाल्या आहेत.
येथील महानगरपालिकेच्या २ प्रभागांसाठी रविवारी मतदान झाले होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी कल्याण मंडपम निर्वाचन अधिकारी डॉ. सुचित्रा शिंदे, सहायक निर्वाचन अधिकारी तहसिलदार विद्याचरण कडवकर, उपायुक्त गणपत जाधव, सहायक लेखाधिकारी राठोड, भगवान यादव, बाळासाहेब मोहरीर, फुटाणे, रईस खान, मंजूर हासन, करूणा स्वामी, साहेबराव पवार, मो. अन्नान, परमेश्वर पारधे यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली. यात यात प्रभाग क्र. ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रोडे तर प्रभाग क्र. ११ मध्ये एमआयएम पक्षाच्या फातेमा अब्दुल जावेद या विजयी झाल्या आहेत.
प्रभाग क्र. ३ 'ड' मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गवळणबाई रामचंद्र रोडे यांना ६ व्या तथा शेवटच्या फेरी अखेर ३ हजार ६८ मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार अलिमोद्दीन इमामोद्दिन काजी यांना १ हजार ३४९ आणि तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अपक्ष उमेदवार फिरोजखान कलंदर खान यांना १ हजार २६५ मतदान मिळाली.