परभणी - सुमारे महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. यामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून केवळ किराणा आणि भाजीपाला दुकानांना सकाळी 7 ते 11 दरम्यान सूट देण्यात आली होती. मात्र, आता 'ब्रेक द चेन' अंतर्गत शासनाने टाळेबंदीचा कालावधी आणखीन 15 दिवस वाढवला आहे. यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी किराणा आणि भाजीपाला दुकानांना सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सूट दिली आहे. मात्र, इतर सर्व आस्थापना बंद राहणार असल्याने व्यापार्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, शनिवार-रविवार हे दोन दिवस सर्वकाही बंद राहणार असून, कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
बँका, शेती दुकानांना पुर्वीप्रमाणेच सूट
या लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील बँकामधील पीसी व सीएसपी सेवा बँकाच्या नेहमीच्या वेळाप्रमाणे चालू राहतील. तसेच कृषी निविष्टा, रासायनिक खते, औषधे बि-बियाणे व शेती संबंधित निगडीत सर्व दुकाने, बाजार समिती, मोंढा, आडत बाजार यांना आठवड्याचे सर्व दिवस सकाळी 7 ते 5 वाजेपर्यंत परवानगी राहील. कोरोना विषयक वैद्यकीय सेवा, सहाय्यभूत सेवा आठवड्याचे पूर्ण दिवस पूर्ण वेळ चालू राहणार आहे.
घरपोच सेवांना परवानगी
या लॉकडाऊनमध्ये घरपोच सेवांना सूट देण्यात आली आहे. तसेच शासकीय-निमशासकीय वाहनांना परवानगी असून, पेट्रोलपंप, गॅस वितरक यांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय लसीकरणासाठी नागरिकांना परवानगी असून स्वस्तधान्य दुकानदारांनी शक्य तो घरपोच धान्य पुरवठा करावा, असे सांगण्यात आले आहे. याप्रमाणेच पिण्याचे पाणी पुरवणार्यांना परवानगी असून, ई-कॉमर्स सेवा, औद्योगिक कारखान्यातील कामगारांना सूट देण्यात आली आहे. तर पेपर आणि दुध विक्रेत्यांना सकाळी 6 ते 9 पर्यंत सुट राहील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
अन्य आस्थापनाधारक व्यापारी अस्वस्थ
दरम्यान, अत्यावश्यक सेवा नसणार्या व्यापाऱ्यांना प्रशासनाने व्यवहार करण्यास सूट दिली नाही. त्यामुळे हे विक्रेते कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर 8.4 असल्याने अन्य आस्थापनांना शासन निर्देशाप्रमाणे दैनंदिन व्यवहारास सूट देता येणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. ज्यामुळे नाभिक, कापड विक्रेते, रेडीमेड्स, गारमेंट्स, हॉटेल्स, उपहारगृहे, रस्त्याच्या बाजूना ठाण मांडून छोट-छोटे व्यवसाय करणारे विक्रेते, मॉल्स, शॉपींग सेंटर्स वगैरेंवरील निर्बंध कायम राहणार, हे स्पष्ट आहे.
हेही वाचा-राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला, असे असतील पॉझिटीव्हीटी रेटनुसार नवीन नियम