परभणी - जिल्ह्यात शनिवारी (12 जून) रात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक भागात दाणादाण उडाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे शहरातील गंगाखेड रस्त्यावर पिंगळगड नाल्याच्या पुलाचे काम सुरु आहे. गुत्तेदाराने नाल्याचे पाणी अडवल्याने हे पावसाचे पाणी शेकडो घरांमध्ये शिरले. ज्यामध्ये लोकांच्या संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच जोरदार पावसामुळे पालम तालुक्यातील लेंडी नदीला पूर आला. परिणामी जवळपासच्या 5 गावांचा पालमशी तब्बल 3 तास संपर्क तुटला होता. दरम्यान, पावसामुळे फटका बसलेल्या नागरिकांना मदत करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
रविवारीही पावसाने झोडपले
परभणी जिल्ह्याला शनिवार पाठोपाठ रविवारी रात्रीसुध्दा सोसाट्याच्या वार्यासह विजांच्या कडकडाटात पावसाने झोडपून काढले. शनिवारी मध्यरात्री सुमारे दीड तास जोरदार पाऊस झाला. या पावसाने सखल भागातील वसाहतीत मोठी दाणादाण उडवली. घराघरांमध्ये पाणी शिरले. रविवारी दुपारपर्यंत ते पाणी हटविताना सर्वसामान्य नागरिकांना मोठी कसरती करावी लागली. त्यानंतर रविवारी रात्रीही पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. मध्यरात्री सोसाट्याच्या वार्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला.
पिंगळगड नाल्याच्या कामामुळे शेकडो घरांमध्ये शिरले पाणी
गंगाखेड-परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील पिंगळगड नाल्याच्या पुलाचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे गुत्तेदाराने नाल्यातून वाहणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी बाबर कॉलनी, मंत्री नगर, साखला प्लॉट, क्रांती नगर या सखल भागातील वस्त्यांमधील शेकडो घरात घुसले. यामुळे या भागातील गोरगरीब नागरिकांच्या घरातील साहित्य, अन्नधान्य, कपडे मोठ्या प्रमाणात भिजले. या लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या परिसरातील नगरसेवक सुशील कांबळे यांनी या लोकांची व्यवस्था एका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात केली आहे. परंतु प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून या नागरिकांच्या अन्नधान्याची व्यवस्था करावी, त्यांना मदत पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रस्तेही जलमय
परभणी पालिका प्रशासनाने मान्सूनपूर्व नाल्यांची साफसफाईची कामे व्यवस्थित न केल्यामुळे संपूर्ण शहरवासीयांना या पावसाचा मोठा फटका बसत आहे. या पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. नाल्यांचे पाणी रस्त्यांवरुन वाहत होते. गांधी पार्क, स्टेशन रोड, कच्छी बाजार आदी मुख्य बाजार पेठेतील रस्त्यांसह वसमत रोड, गंगाखेड रोड, पाथरी रोड तसेच जूना पेडगाव रस्त्याला नद्यांचे स्वरूप आले होते. तर चिद्रवार नगरात काही घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरीकांची तारांबळ उडाली.
पुरात पर्यायी रस्ता गेला वाहून
शहरानजीकच्या गंगाखेड रोडवर पिंगळगड नाल्यावर नव्या पुलाचे काम चालू आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे पूर आला. त्या पुरात पर्यायी रस्ता वाहून गेला. विशेष म्हणजे चार दिवसापूर्वीच पुलावर स्लॅब टाकला आहे. मात्र, काही वाहनचालकांनी त्यावरूनच वाहतूक चालू केली. जड वाहनेसुद्धा यावरून जात असल्याने पूल खचत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पुलावरून जड वाहतुकीस बंदी केली. या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला असून पोलीस वाहतुकीचे नियोजन करत आहेत.
पालमच्या लेंडी नदीला पूर; 5 गावांचा संपर्क तुटला
पालम शहरापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या जांभूळ बेट रस्त्यावरील लेंडी नदीला पूर आला. या ठिकाणच्या पुलावर पाणी आले. त्यामुळे सकाळी ३ तास 5 गावांचा पालम शहरांशी संपर्क तुटला होता. पालम ते जांभूळ बेट या रस्त्यावर लेंडी नदीच्या पात्रात कमी उंचीचा जुना नळकांडी पूल आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूंना गाळ साचून नळ्या बुजून गेल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडताच पुराचे पाणी पुलावर येऊन रस्ता नेहमीच बंद पडतो. मागील वर्षी तब्बल २८ वेळा हा रस्ता बंद पडला होता. याकडे शासकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याने पुलाचा प्रश्न कायम आहे. परिणामी जोरदार पावसाचा फटका फळा, सोमेश्वर, घोडा, उमरथडी, आरखेड या गावांना बसतो. त्याप्रमाणे आज (14 जून) सकाळी 7 ते 10 या वेळेत पुरामुळे या गावांचा संपर्क तुटला होता.
हेही वाचा -राम मंदिर ट्रस्टच्या जमीन घोटाळ्यासंबंधी सरसंघचालकांनी स्पष्टीकरण द्यावे - संजय राऊत