परभणी - पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात थेंबभर पाण्याचा साठा होऊ शकलेला नाही. अशा परिस्थितीत तहानलेल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी खुशखबर आहे. उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधून सोडलेले पाणी जायकवाडीत आले आणि ते पुढे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाऱ्यात झेपावले आहे. यामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता काही अंशी का होईना मिटली आहे.
पाथरी शहर आणि जवळपासच्या अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या ढालेगाव बंधाऱ्यात जायकवाडीच्या पैठण डाव्या कालव्याच्या (काट नियमक १२२.३४० किमीच्या) सांडव्यातून शुक्रवारी पिण्यासाठी प्रती सेकंद दीडशे ते दोनशे क्यूसेसने पाणी सोडल्याची माहिती, जायकवाडी उपविभाग क्रमांक ६ चे उपअभियंता खारकर यांनी दिली. दरम्यान, पाथरी शहरात मे महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई आहे. तीन दिवसाला मिळणारे पाणी आता बारा-पंधरा दिवसाला सुटत आहे. पावसाळा अर्धा अधिक संपूनही पाथरी तालुक्यातील ढालेगाव आणि मुदगल बंधारे कोरडे आहेत. त्यामुळे गोदाकाठावरील गावांत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.