परभणी - मुघल आणि निझाम राजवटीविरोधात लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या संस्थानातील मुस्लिमांशी कधीच दुजाभाव केला नाही. त्यांच्या कारभारात मुस्लिमांचा बरोबरीने सहभाग होता. अशा थोर महापुरुषाच्या जयंतीचे औचित्य साधून पाथरीत झालेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात हिंदू-मुस्लीम आंतरधर्मीय विवाह पार पडला. हा विवाह म्हणजे एक प्रकारे महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा मुजराच असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पाथरी येथील ओंकार सेवाभावी संस्था, पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पाथरी-मानवत राष्ट्रीय महामार्गालगत शिवजन्मोत्सवानिमित्त विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात अपंग असलेला हिंदू मुलगा आणि मुस्लीम मुलीचे लग्न लावण्यात आले. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज त्याकाळी मंदिरासोबत मशीद बांधून जो एकतेचा संदेश देत होते, त्या इतिहासाची यानिमित्ताने एकप्रकारे पुनरावृत्ती झाली आहे.
डॉ. जगदिश शिंदे यांच्या पुढाकारातून शिवजयंतीचे औचित्य साधून पाथरी शहरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. यात १८ हिंदू, २ बौद्ध आणि ७ मुस्लीम विवाह लावण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील सहधर्मदाय आयुक्त देशमुख होते. आमदार राहूल पाटील, माजी आमदार हरिभाऊ लहाने, मेघना बोर्डीकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त सदाशिव थोरात आणि मान्यवरांची उपस्थिती होती.
परभणीत पार पडला आंतरधर्मीय विवाह सोहळा दरम्यान, या आंतरधर्मीय विवाहाची चर्चा या सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात होत होती. धर्माच्या, जातीच्या चौकटी तोडत या दोन्ही कुटूंबांनी हा निर्णय घेतला. अशा पद्धतीने विवाह पार पडल्याने उपस्थितांनी या दोन्ही कुटुंबांचे कौतूक केले. मान्यवरांनी या नवदांम्पत्यांना आशिर्वाद दिले. शिस्त आणि नियोजनबद्ध पार पडलेल्या या विवाह सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.