महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर; फटाक्यांची अतिषबाजी, आंदोलन यशस्वी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात मंजूरी दिल्याची घोषणा केली. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल करीत वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करावे, यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळींनी 'आम्ही परभणीकर' म्हणून सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले.

By

Published : Sep 19, 2021, 10:35 AM IST

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर
परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर

परभणी - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात मंजूरी दिल्याची घोषणा केली. परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल करीत वैद्यकीय महाविद्यालय जाहीर करावे, यासाठी शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळींनी 'आम्ही परभणीकर' म्हणून सुरू केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले. यानंतर परभणी जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत सर्वपक्षीय नेते आणि सामान्य परभणीकरांनी देखील जल्लोष केला.

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर

सर्वपक्षीय नेतेमंडळींचा एकत्रित जल्लोष -

परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील मराठवाडा मुक्ती दिनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात घोषणा केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार सुरेश देशमुख, उपमहापौर भगवान वाघमारे, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, शेकापचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी आणि सामान्य परभणीकर तसेच व्यापारी आणि सामान्य परभणीकर यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात वसमत रोड गाँधी पार्क आणि शिवाजी चौक येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. यावेळी सभापती गुलमिर खान, अतुल सरोदे, सुनील देशमुख, सचिन अंबिलवादे, सचिन देशमुख, प्रभाकर पाटील वाघीकर, माणिक पोंढे, श्रीधर देशमुख यांच्यासह शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फटाक्यांची अतिषबाजी, आंदोलन यशस्वी

तालुक्याच्या ठिकाणीही आनंदोत्सव -

दरम्यान, 2018 पासून परभणीकरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लढा सुरू केला होता. त्यास अखेर यश आल्याचे दिसून येताच परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी देखील फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. सेलु, मानवत, पालम, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, पूर्णा आदी ठिकाणी देखील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

फटाक्यांची अतिषबाजी, आंदोलन यशस्वी

हिणवणाऱ्यांचेही धन्यवाद - खासदार जाधव

परभणीकरांसाठी जिव्हाळ्याचा बनलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गांभीर्याने घेऊन त्याच आज मंजुरी दिल्याची घोषणा केल्याबद्दल खासदार संजय जाधव यांनी त्यांचे आभार मानले. तसेच 2018 पासून वैद्यकीय महाविद्यालयासाठी लढा सुरू असून, यामध्ये सर्वपक्षीय नेते, कामगार, व्यापारी, ऑटो चालक, हमाल, वकील, डॉक्टर आदीसह सर्व स्तरातील मंडळी सहभागी झाली होती. या सर्वांचे धन्यवाद देतानाच या आंदोलनाला हिणवणाऱ्यांना देखील खासदार जाधव यांनी धन्यवाद दिले.

परभणीकरांचे साखळी धरणे आंदोलन -

दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली 2018 पासून आंदोलन सुरू आहे. गेल्या महिन्यातच परभणी शहरातील डॉक्टर्स, इंजिनीयर, वकील, कामगार, युवावर्ग, महिला, सर्वपक्षीय नेते आणि सामान्य परभणीकर अशा सर्वांच्या सहभागातून पाच दिवसांचे साखळी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर खासदार जाधव हे स्वतः आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात प्राणांतिक उपोषणाला बसणार होते. परंतु शिवसेना श्रेष्ठींनी तसेच काँग्रेसचे आमदार सूरेश वरपूडकर, माजी आमदार सूरेश देशमुख यांनी त्यांना परावृत्त केले. त्यामुळे जाधव यांनी उपोषणाचा मार्ग स्थगित करीत मुंबई गाठली. पक्ष श्रेष्ठीबरोबर चर्चा केली. खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे यांच्यासह परभणीकर संघर्ष समितीने देखील मुंबईत पाठपुरावा केला होता.

जिल्हा रुग्णालयालाच मिळणार महाविद्यालयाचा दर्जा-

परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा बहाल करीत वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याच्या प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्य केला. तसेच राज्य मंत्रीमंडळात प्रस्ताव आणूण त्यास मंजूरी बहाल करण्यात येईल, असा अंदाज आहे. विशेष म्हणजे या संदर्भात जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाची प्रशासकीय इमारत व अन्य जागा महाविद्यालयाला हस्तांतरित करण्याची संमती देणारा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. त्या आधारेच हा प्रस्ताव मंजूर होऊन आहे त्या जिल्हा रुग्णालयातच शासकीय महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details