महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 7, 2020, 8:29 PM IST

Updated : Sep 7, 2020, 10:19 PM IST

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे मुलींच्या शिक्षणाचा टक्का घसरण्याची शक्यता

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. यावर मार्ग काढत ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला. अनेक घरांमध्ये एकच अँड्राइड फोन उपलब्ध असल्यास मुलांना प्राधान्य दिले जाते. यामुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

online education
ऑनलाइन शिक्षण

परभणी- आपल्या देशात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण पूर्वीपासूनच कमी आहे. कोरोना संकटात शाळा सुरु करणे शक्य नसल्याने ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा वापर सुरू करण्यात आला. यामुळे मुलींच्या शिक्षणाचा टक्का आणखी घसरण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण आजही कित्येक घरांमध्ये मुलगा-मुलगी असा भेदभाव केला जातो. सध्या अनेक पालक ऑनलाइन शिक्षण पद्धतीसाठी लागणारा मोबाइल, टॅब, इंटरनेट आदी सुविधा मुलींच्या तुलनेत मुलांना प्राधान्याने उपलब्ध करून देत असल्याचे निदर्शनास येत आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्राइड फोन किंवा साधाही फोन नाही ते ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा फटका मुलींच्या शिक्षणाला बसण्याची शक्यता

कोरोनामुळे लॉकडाऊनची परिस्थिती ओढवली आहे. ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. परिणामी यावर्षीचे शैक्षणिक सत्रच अद्याप सुरू झालेले नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता अनेक शाळा व महाविद्यालयांनी ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. मोबाईल, टॅबच्या माध्यमातून घरी असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून शिकवले जात आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल 82 हजार पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाही. 94 हजार 309 पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. मात्र, त्या घरात एकाहून अधिक विद्यार्थी असतील, त्या ठिकाणीच्या विद्यार्थ्यांची शाळा आणि शिकवणीच्या तासिकेची वेळ एकच असल्यास या मोबाइलएका विद्यार्थ्याला वापरता येतो. विशेषतः घरात मुलगा, मुलगी असेल तर अशा वेळी मोबाइलचा वापर करण्यासाठी मुलाला प्राधान्य देण्यात येत असल्याचे निदर्शनास येते.

जिल्ह्यात एकूण शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 2 लाख 19 हजार 887 मुले असून 1 लाख 90 हजार 249 मुली आहेत. टक्केवारीत याचा विचार केल्यास 53 टक्के मुलांचे प्रमाण असून 47 टक्के मुली आहेत. मुलींचे आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याचे प्रमाण चांगले आहे. दहावी आणि पुढे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणात मुलींचे प्रमाण निम्म्याहून कमी होत असते, या कारणांमध्ये ऑनलाइन शिक्षण पद्धती देखील कारणीभूत ठरणार आहे. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर अनेक मुलींचा विवाह केला जातो. त्यामुळे इच्छा असूनही अनेक मुलींना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता येत नाही. विवाहानंतरही काही मुली शिक्षण पूर्ण करतात. मात्र, त्यांची संख्या अत्यंत थोडी आहे.

परभणीतील महिला जागृती सेवाभावी संस्थेच्या संचालिका आरती झोडपे यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केले आहे. ऑनलाइन शिक्षणाचे एकच साधन उपलब्ध असल्यास मुलांना प्राधान्य देण्यात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या संदर्भात काम करण्याचे झोडपे यांनी ठरवले आहे. 'गोरगरीब तथा मोलमजुरी करून खाणाऱ्या घरांमध्ये एखादाच स्मार्ट फोन उपलब्ध असतो. त्या घरातील मुलाला प्राधान्याने तो देण्यात येतो. त्यामुळे त्या घरातील मुलगी शिक्षणापासून वंचित राहत आहे. किंवा वेळेवर फोन उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम त्या मुलीच्या शिक्षणावर होतो. तिचा अभ्यास अर्धवट राहतो, असे आरती झोडपे यांनी सांगितले.

या संदर्भातील सर्वेक्षण पूर्ण करून आम्ही या परिस्थितीचा अहवाल शासनापर्यंत पोहोचवून स्मार्ट फोनपासून वंचित राहणाऱ्या मुलींना अँड्रॉइड मोबाईल, टॅब आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करणार आहोत, असे आरती झोडपे यांनी सांगितले.

ऑनलाइन शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी संदर्भात काही मुलींशी चर्चा करण्यात आली त्यांनी देखील मुलांना प्राधान्य देण्यात असल्याचे सांगतिले. भक्ती काळे या विद्यार्थिनीने यासंदर्भात बोलताना, भावाचा ऑनलाइन क्लास तिच्या क्लासच्या वेळेतच चालू झाल्यास तो आधी पूर्ण करतो त्यामुळे क्लास बुडत असल्याचे सांगितले. ऑनलाइन पद्धतीने जे काही शिकवले जाते एखाद्या मैत्रिणीला विचारते आणि समजावून घेते, असे तिने सांगितले. अनेक वेळा क्लासेस बुडत असल्यामुळे अभ्यास अपूर्ण राहतो', अशी खंत इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या भक्ती काळे या विद्यार्थिनीने व्यक्त केली आहे.

परभणीतील शाळांचे ऑनलाइन शिक्षणासंदर्भात सर्वेक्षण

शिक्षणाच्या बाबतीत केवळ परभणी जिल्ह्यापुरता विचार केल्यास जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी, अनुदानित, स्वयं अर्थसहाय्य तसेच कायम विनाअनुदानित, विनाअनुदानित, केंद्र शासन आणि सैनिकी अशा एकूण 2 हजार 7 शाळा आहेत. या शाळांमधून तब्बल 4 लाख 10 हजार 136 विद्यार्थी शिक्षण घेतात. ज्यामध्ये 2 लाख 19 हजार 887 मुलं तर 1 लाख 90 हजार 249 मुलींची संख्या आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग अबाधित रहावे व संसर्ग पसरू नये, म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धती सुरू करण्याच्या दृष्टीने या शाळांपैकी जिल्हा परिषद, खासगी अनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांचे शासनामार्फत सर्वेक्षण झाले आहे.

इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या 1 हजार 91 तर खासगी अनुदानित 275 आणि स्वयंअर्थसहाय्य 220 शाळा आहेत. यामधून शिकणाऱ्या 2 लाख 17 हजार 157 विद्यार्थी आणि 8 हजार 656 शिक्षकांकडे अँड्रॉइड मोबाइल किंवा इंटरनेटच्या उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. ज्यामध्ये 7 हजार 984 शिक्षकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहे. हे प्रमाण 92 टक्के असून उर्वरीत जवळपास 8 टक्के शिक्षकच अँड्रॉइड मोबाईल वापरत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

57 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड फोन नाही

2 लाख 17 हजार 157 विद्यार्थ्यांपैकी केवळ 94 हजार 309 विद्यार्थ्यांच्या पालकांकडेच अँड्रॉइड मोबाईलची उपलब्धता आहे. हे प्रमाण केवळ 43 टक्केच असून, उर्वरित 57 टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाइल नाही. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण या विद्यार्थ्यांना कसे मिळणार? हा प्रश्नच आहे. तसेच 82 हजार 84 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे साधा मोबाईल असल्याने शिक्षण विभाग त्यांच्यापर्यंत केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाबद्दल किंवा शैक्षणिक विषयांबद्दल निरोप पोहचवू शकतो. मात्र, तब्बल 40 हजार 253 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड किंवा साधा मोबाईल सुद्धा नसल्याची माहिती शासनाच्या याच सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी पूर्णतः शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

Last Updated : Sep 7, 2020, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details