परभणी- जागेच्या वादातून आमचे फोन का उचलत नाहीत? या कारणावरुन काँग्रेसच्या एका माजी नगराध्यक्षाच्या मुलाने गंगाखेडचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांना मारहाण केली आहे. हा प्रकार तापडिया यांच्या खासगी कार्यालयात घडला असून याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेडच्या नगराध्यक्षाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण, गुन्हा दाखल - मारहाण
आरोपींनी विनापरवानगी तापडिया यांच्या कार्यालयात प्रवेश करत तुम्हाला आम्हीच नगराध्यक्ष केले, तुम्हाला या गावांमध्ये राहायचे नाही का? असे म्हणत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत चोपडिया यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.
नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया हे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरपरिषद गंगाखेड येथून घराकडे जात असताना शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या दक्षिणेस कंपाउंड वॉलला लागून कोणाचे तरी बांधकाम चालू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तापडिया यांनी तात्काळ नगरपरिषद अभियंता भोकरे यांना सदर बांधकामाबाबत अधिक चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार अभियंता भोकरे यांनी बांधकामाची पाहणी केली असता, सदर बांधकाम शहरातील रुद्रवार यांचे होते. त्या बांधकामास नगरपरिषदेणे परवानगी दिलेली असल्याचेही सांगितले. परंतू हे बांधकाम परवानगी प्रमाणे चालू आहे का? याची खात्री करून घेण्यास अभियंता भोकरे यांना तापडिया यांनी सांगितले होते. मात्र, याच कारणावरून आरोपी सुशांत चौधरी, साहेबराव चौधरी, शेख युनूस यांनी विनापरवानगी कार्यालयात प्रवेश करत तुम्हाला आम्हीच नगराध्यक्ष केले, तुम्हाला या गावांमध्ये राहायचे नाही का? असे म्हणत मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत चोपडिया यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.
याप्रकरणी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी ३ आरोपींविरुद्ध तक्रार दिली. या प्रकाराबाबत गुरुवारी उशिरा गुन्हा दाखल झाला असून याचा तपास फौजदार बालाजी लोसरवार करीत आहेत. तापडिया यांनी या तिघांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. काँग्रेसच्या अंतर्गत कलहामुळे हा प्रकार घडला असल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.