परभणी -राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण तब्बल दहा वर्ष सतत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले. पक्ष वाढवण्यासाठी गावोगावी फिरून मोठी मेहनत घेतली. मात्र, नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अतिरिक्त भरणा झाला. या अतिरिक्त लोकांकडून जे राजकारण होत आहे. त्यालाच कंटाळून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे विजय वरपूडकर यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर विजय वरपूडकरांनी आज (शनिवारी) सायंकाळी माध्यमांसमोर भाजप प्रवेशाची घोषणा केली असून, महिना अखेरीस मुंबईत हा प्रवेश होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
परभणीच्या राजकरणात खळबळ; माजीमंत्री वरपुडकरांचे बंधू विजय वरपूडकर यांचा भाजप प्रवेश निश्चित - BJP leader Raosaheb Danve
विजय वरपूडकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आज (शनिवारी) सायंकाळी माध्यमांसमोर भाजप प्रवेशाची घोषणा केली असून, महिना अखेरीस मुंबईत हा प्रवेश होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
वरपूडकरांच्या भाजप प्रवेशाची जिल्ह्यात जोरदार चर्चा -
विशेष म्हणजे विजय वरपूडकर यांचे बंधू मोठे बंधू सुरेश वरपूडकर हे काँग्रेसचे बडे नेते असून, सध्या ते पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. शिवाय परभणीची बाजार समिती आणि महापालिका देखील त्यांच्या ताब्यात आहे. तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर देखील त्यांचे वर्चस्व आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव असून ते माजी मंत्री देखील आहेत. जिल्ह्यातील एवढी सत्ताकेंद्रे त्यांच्या ताब्यात असताना देखील यांचा सख्खा भाऊ विरोधी पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात हा एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश - विजय वरपूडकर
राज्यात गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती झाली असली तरी परभणी जिल्ह्याच्या राजकारणात मात्र या तीनही पक्षाचे नेते पूर्वीपासूनच सोबत आहेत. हे नेते एखाद्या कार्यकर्त्याला पाडायचे की वर आणायचे, हे एकत्र बसून ठरवतात. भाजपमध्ये मात्र असे नाही. भाजपमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केले जाते. म्हणूनच मी माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या महिनाअखेरीस मुंबईत रावसाहेब दानवे, रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विजय वरपूडकर यांनी दिली.