परभणी -पावसाळा सुरू होऊन तब्बल महिनाभरापेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. मात्र, या कालावधीत वार्षिक सरासरीच्या केवळ १३ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात समाधानकारक पाऊस होईल, या आशेवर सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांनी या अल्प पावसावरच पेरण्या उरकल्या होत्या. मात्र, आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास परभणीसह सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली. सुमारे दीड तास बरसलेल्या पावसामुळे उर्वरित ६० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
परभणीत महिन्यातला पहिला समाधानकारक पाऊस; उर्वरित पेरण्या होण्याची शक्यता - पाऊस
परभणीत गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली.
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७७४.६२ मिलिमीटर एवढी आहे. मात्र, गेल्या काही वर्षात पावसाने ही सरासरी कधी गाठलीच नाही. ज्यामुळे गेल्या २ वर्षांपासून परभणी जिल्हा अवर्षणाचा सामना करत असून शेतकरी दुष्काळात होरपळत आहे. या परिस्थितीत यंदा तरी वरुण राजा प्रसन्न होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नवीन पिकांच्या पेरण्याची पूर्ण तयारी केली होती. पण मान्सून सुरुवातीलाच लांबला आणि जिल्ह्यात पावसाने २३ जूनला हजेरी लावली. त्यानंतर काही दिवस पडलेल्या पावसानंतर गेला आठवड्याभर पावसाने खंड दिला होता. आता २ दिवसानंतर पुन्हा एकदा पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या २ दिवसात प्रचंड ढगाळ वातावरण तयार होऊन मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त होत होती. पण तसे झाले नाही. आज गुरुवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १०२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस जून महिन्याच्या सरासरीच्या केवळ ५० टक्केच आहे तर वार्षिक सरासरीच्या फक्त १३ टक्के आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक पाऊस पडायला हवा होता, पण तसे झाले नाही. त्यामुळे जिल्हाभरात झालेल्या ४० टक्के पेरण्या वाया जातात की काय ? असा प्रश्न निर्माण झाला होता आणि शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. शिवाय उर्वरित पेरण्या करणारे शेतकरी देखील चिंतित होते. मात्र, आता त्यांची ही चिंता सध्या तरी मिटल्याचे दिसून येते. मंगळवारी-बुधवारीवा झालेला पाऊस आणि आज पडलेला समाधानकारक पाऊस हा शेतकऱ्यांना तारणारा ठरणार आहे.