परभणी - जिल्ह्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज (गुरुवार) आढळून आला आहे. ज्यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेली परभणी अचानक ऑरेंज झोनमध्ये गेली आहे. परभणीतील ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, तो भाग तत्काळ प्रशासनाकडून सील करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात आढळला पहिला कोरोनाग्रस्त तरुण आत्तापर्यंत परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र, आज एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने या परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी स्वतः भेट देऊन या भागाची पाहणी केली. तसेच या भागातील नागरिकांना तत्काळ आपल्या तपासण्या करून घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यापासून आजपर्यंत परभणीत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता. परभणी जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले होते. परंतू, काही दिवसांपूर्वी अचानक पुणे येथून आलेल्या 21 वर्षीय तरुण-तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. 14 एप्रिल रोजी संध्याकाळी हा तरुण सर्दी खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता. त्यानंतर त्याच्यात कोरोनाचे लक्षण आढळून आल्याने त्याला तत्काळ संसर्गजन्य कक्षात दाखल करून त्याच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सकाळी येऊन धडकला आणि परभणीत खळबळ उडाली. त्याहूनही चिंतेची बाब म्हणजे 15 दिवसांपासून हा तरुण औद्योगिक वसाहतीच्या परिसरात तसेच वसमत रोडवर वावरत होता. त्यामुळे परभणीच्या औद्योगिक वसाहतीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्याचे काम महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्त तरुणाच्या घराच्या परिसरातील लोकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. कोणीही घराच्या बाहेर पडायचे नाही. लोकांना खोकला, सर्दी, ताप काहीही त्रास असल्यास तत्काळ तपासण्या करून घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय सदर तरुणाच्या नातेवाईक आणि संपर्कात आलेल्या काही लोकांना जिल्हा रुग्णालयात आणि अलगीकरण कक्षात दाखल करण्याचे काम देखील सुरु झाले आहे. शिवाय गेल्या 15 दिवसात या तरुणाच्या संपर्कात येणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. संपर्कात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता असून, यामुळे आत्तापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या परभणी जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
'त्या' भागाचे निर्जंतुकीकरण
दरम्यान, कोरोनाचा रूग्ण आढळून आलेल्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात निर्जंतुकीकणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. या भागात निर्जंतुकीकरण फवारणी सुरू झाली असून, आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.