परभणी : पालम तालुक्यातील गणेशवाडी येथे रविवारी (१२ सप्टेंबर) शेतात बाप-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (१३ सप्टेंबर) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडकीस आली. दरम्यान, या घटनेचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या प्रकरणी पालम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय ४० वर्ष) व वैष्णवी नागनाथ बल्लोरे (वय १४ वर्ष) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते शेतात -
पालम तालुक्यातील गणेशवाडी येथील नागनाथ साहेबराव बल्लोरे (वय ४० वर्ष) व वैष्णवी नागनाथ बल्लोरे (वय १४ वर्ष) हे दोघेजण रविवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये बांधलेल्या जनावरांना चारा टाकण्यासाठी गेले होते. परंतु खूप वेळ झाल्यानंतरही ते घराकडे परतलेच नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी रविवारी शेतात जावून पाहणी केली. शेतातील विहिरीजवळ नागनाथ बल्लोरे यांची चप्पल व मोबाईल आढळून आला. त्यामुळे नातेवाईकांनी विहिरीत पाहणी केली. मात्र, विहिरीत पाणी अधिक असल्याने ते आढळून आले नाहीत. विहिरीतील पाणी विद्युत पंपाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. सोमवारी (13 सप्टेंबर) दुपारी एक वाजता नागनाथ बल्लोरे व वैष्णवी बल्लोरे या बापलेकीचा मृतदेह आढळून आला. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हालवण्यात आले.