परभणी - शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक विमा भरताना काही तलाठ्यांकडून अडवणूक केली जात आहे. कधी सातबारा तर कधी होल्डींगसाठी जादा रकमेची मागणी, तर कधी सक्तीची शेतसारा वसुली करत शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याबाबत काँग्रेसने बुधवारी गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कमलाकर फड यांची भेट घेवून ही अडवणूक थांबवण्यासाठीची मागणी केली.
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पीक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. शेवटची तारीख २४ जुलै असून ही मुदत वाढण्याची शक्यता आहे. परंतू सध्याच्या परिस्थितीत पाऊस दगा देत असल्याने पीक विमा भरणा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र याचा तलाठी कार्यालयात काम करणाऱ्या काही सहाय्यकांकडून गैरफायदा घेत सातबारासाठी जादा रक्कम उखळल्या जात आहे. तसेच काही तलाठी शेतसारा वसुलीचे ऊद्दीष्टही या निमित्ताने पूर्ण करून घेत आहेत. या संदर्भातील तक्रारी यादव यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत गोविंद यादव यांनी उपविभागीय अधिकारी फड यांचे निवासस्थान गाठले. यासंदर्भात आजच गंगाखेड, पालम आणि पुर्णा तालु्क्यातील संबंधीत अधिकाऱ्यांना ताकीद दिली जाईल, अशी ग्वाही फड यांनी दिल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते गोविंद यादव यांनी दिली. त्यांच्यासोबत धनगर साम्राज्य सेनेचे अध्यक्ष सखाराम बोबडे व शेतकरी उपस्थित होते.