परभणी - मुबलक पाणी असल्याने सेलू तालुक्यातील एका शेतकऱ्याने मोठ्या उत्साहाने 600 झाडांची लिंबुची बाग कष्टाने फुलवली होती. मात्र, या लिंबाला आधी बाजारपेठच उपलब्ध झाली नाही. त्यातच लॉकडाऊन लागल्याने मजूर मिळाले नाही. परिणामी अर्धे लिंबू झाडावरच वाळून गेले तर अर्धे पिकल्याने गळून पडले. यामुळे मुंजा शेळके या शेतकऱ्याचे शंभर टक्के नुकसान झाल्याने त्यांनी जेसीबी फिरवून ही बागच नष्ट करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे त्यांना तब्बल पाच लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे.
लॉकडाऊनचा फटका; परभणीच्या शेतकऱ्याने लिंबाची बाग केली नष्ट, 5 लाखांचे नुकसान - lemon farming
सेलू तालुक्यातील लाडनादरा येथील शेतकरी मुंजा शेळके यांनी दोन वर्षांपूर्वी तज्ञांच्या सल्ल्याने लिंबाची 600 रोप लावली. पीकही भरघोस आले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे मजूर उपलब्ध होत नव्हते. ज्यामुळे काढणी अभावी अर्धे लिंबू पिकून गळून पडले तर अर्धे लिंबू झाडालाच वाळून गेले.
कोरोनाचा फटका हातावर पोट असणाऱ्या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसला. सेलू तालुक्यातील लाडनादरा येथील शेतकरी मुंजा शेळके यांनी दोन वर्षांपूर्वी तज्ञांच्या सल्ल्याने लिंबाची 600 रोप लावली. पीकही भरघोस आले. परंतू, लिंबू जवळपासच्या बाजारात कुठेच विकल्या जात नव्हते. त्यामुळे तज्ञांना विचारल्यास त्यांनी यासाठी पुणे, मुंबई, गुजरात आदी ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, आता माल पिकवावा की बाजारपेठेत नेऊन विकावा, अशा संभ्रमावस्थेत शेळके होते. याच दरम्यान कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन झाले आणि सगळाच कारभार थांबला.
लॉकडाऊनमुळे मजूर उपलब्ध होत नव्हते. ज्यामुळे काढणी अभावी अर्धे लिंबू पिकून गळून पडले तर अर्धे लिंबू झाडालाच वाळून गेले. एकीकडे मुबलक पाणी उपलब्ध असताना दुसरीकडे महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे पंधरा-पंधरा दिवस वीज उपलब्ध झाली नाही. ज्यामुळे पाणी देण्याअभावी झाडे देखील वाळून गेली आहेत. अशा परिस्थितीत शेळके यांनी या सर्व लिंबाच्या झाडावर जेसीबी फिरवण्याचा निर्णय घेतला. टोकाचे पाऊल उचलत जीवापाड जपलेली संपूर्ण बाग त्यांनी नष्ट केली. ज्यामुळे त्यांना साधारणपणे पाच लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याप्रकरणी संबंधित विभागाने लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेळके यांनी केली आहे.