परभणी -शेतकऱ्यांच्या नावे परस्पर 328 कोटी रुपयांचे कर्ज उचलून त्यांना फसवणाऱ्या उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्या दहा प्रतिष्ठानांवर ईडीने एकाच वेळी धाडी टाकल्या आहेत. परभणीच्या कारागृहात 26 मार्च पासून मुक्कामी असलेल्या गुट्टे यांच्यावर इडीने कारवाईचा चांगलाच फास आवळा आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे ते 'रासप' चे उमेदवार होते. विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर होणाऱ्या या कारवाईमुळे आता राजकीय वादंगही निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे बेनामी कर्ज घेऊन सहा बँकांची फसवणूक केल्याच्या आरपोखाली ईडीने रत्नाकर गुट्टे त्यांच्याशी संबधीत गंगाखेड कारखाना, सुनील हायटेक इंजिनिअर्स. लि सह दहा प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर ईडी ने गुरुवारी धाडी टाकल्या. यात कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई गुट्टे यांच्या परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे प्रतिष्ठान, निवासस्थान व बांद्रा वेस्टसह मुंबईत तीन ठिकाणी आणि नागपुरात सिव्हिल लाईन्स व रामदासपेठ येथील निवासस्थानी करण्यात आली. कारवाई गोवा, मुंबई आणि नागपूर ईडीच्या कार्यालयातील २५ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली.
उद्योजक गुट्टे यांचा परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात गंगाखेड शुगर लिमिटेड नावाने साखर कारखाना आणि एक्स्ट्रा नॅचरल अल्कोहोल ( ईएनए ) प्रकल्प आहे. काही वर्षापूर्वी गुट्टे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याची कागदपत्रे, फोटो आदी केवायसी कागदपत्रे तयार केरुन बँकांकडून ३२८ कोटींचे कर्ज घेतले. या कर्जाची परतफेड न केल्यामुळे शेतकरी संकटात आले आहेत. हा घोटाळा त्यांचे विधानसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी उघडकीस आणला होता. शिवाय या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत आवाज उठवून हे प्रकरण उजेडात आणले. त्यानंतर गुट्टे यांच्याविरुद्ध काळा पैसा प्रतिबंधक कायदा २००२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.