परभणी -शहरातील स्वावलंबी महिला बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील मुरुंबा, देवठाणा आणि आसोला परिसरात 7 पोल्ट्रीफार्म चालवले जातात. या शिवाय साबा, पिंपळगाव, पांढरी, रहाटी आणि साटला या 10 किमी परीसरातील गावांमध्ये एकूण 19 पोल्ट्रीफार्म सुरू आहेत. मात्र, या व्यवसायावरच अचानक 'बर्डफ्लू' चे संकट आल्याने बचत गटातील महिला आणि गावांमधील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे प्रशासनाने या कोंबड्या नष्ट करण्यापूर्वी महिला आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वावलंबी पोल्ट्रीफार्म प्रकल्पाचे संचालक सुशील कांबळे यांनी केली आहे.
2 हजाराहून अधिक कोंबड्या पावल्या मरण -
परभणी तालुक्यातील मुरुंबा आणि देवठाणा येथील 4 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना 'बर्ड फ्लू' ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच याचा संसर्ग मुरुंबा गावाच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांमध्ये असलेल्या 19 पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून या ठिकाणच्या 2 हजाराहून अधिक कोंबड्या अचानक मरण पावल्या आहेत. ज्यामुळे महिला आणि शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
भूल देऊन कोंबड्यांना देणार दयामरण-
हा बर्ड फ्लूचा संसर्ग अन्य भागात पसरू नये, म्हणून प्रशासनाच्या वतीने मुरुंबा व परिसरातील 1 किमी वरील 5 पोल्ट्री फार्म मधील सुमारे 8 हजाराहून अधिक कोंबड्या नष्ट करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्यावतीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणच्या पोल्ट्री फार्म चालकांना काही औषधी देण्यात आली असून, या औषधीमुळे कोंबड्या सुस्त होतील. त्यानंतर त्या कोंबड्यांना दयामरण देऊन त्या नष्ट केल्या जाणार आहेत.