परभणी - जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या पेंडू येथील रहिवासी असलेल्या रामदास शिवदास धुळगुंडे (३३) यांचा गडचिरोली येथे सेवा बजावताना मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर रामदास यांचा मृतदेह कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. शनिवारी मुळ गाव पेंडू येथे शासकीय इतमामात रामदास यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रामदास शिवदास धुळगुंडे यांच्या कुंटुबावर शोककळा रामदास हे भारतीय राखीव पोलीस दलात क्रमांक १४ चे जवान होते. गेल्या महिन्यात त्यांच्या पत्नीने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. यामुळे त्यांचे कुटुंबीय आनंदात होते. परंतु, गुरुवारी रात्री रामदास यांच्या निधनाचे वृत्त येताच धुळगुंडे कुटुंबावर शोककळा पसरली. घटनेची माहिती मिळताच त्यांचे चुलते व इतर नातेवाईक गडचिरोलीकडे रवाना झाले.
रामदास यांचा मृत्यू चक्कर येवून पडल्यामुळे - पोलीस अधीक्षक
गुरुवारी गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रामध्ये कर्तव्य बजावत असताना रामदास यांना चक्कर आल्याने ते खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नक्षल सेलचे अप्पर पोलीस अधीक्षक हरी बालाजी यांनी दिली.
मृत्यू नक्षलवाद्यांच्या हल्लात - रामदास यांच्या चुलत भावाचा आरोप
रामदास यांचे चुलत बंधू आप्पाराव धुळगुंडे यांनी मात्र रामदास यांचा मृत्यू नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात झाल्याचा दावा केला आहे. काल रात्री ते आपल्या सहकाऱ्यांसह पेट्रोलिंग करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. त्यात त्यांनी गाडीतून उडी मारली. त्यानंतर, हल्लेखोरांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांच्या सहकारी पोलिसांनी घटनेनंतर दिली होती. परंतु, आता शवविच्छेदन झाल्यानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया आप्पाराव धुळगुंडे यांनी दिली.