परभणी - जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथे झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी रोख रकमेसह ५ लाख ५३ हजाराचा ऐवज लंपास केला. घरातील सर्व सदस्य पहाटेच्या सुमारास साखर झोपेत असताना, चोरट्यांनी हा डाव साधला. विशेष म्हणजे चोरीचा हा प्रकार सकाळी कुटुंबीयांना जाग आल्यानंतर लक्षात आला. दरम्यान, पाथरी तालुक्यातही 5 ते 6 चोरट्यांनी एका कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून लाखभर रुपयांचे दागिने पळवल्याची घटना समोर आली होती.
भोगाव येथील ग्रामस्थ विनोद वामनराव मोरे (वय ३८) शेती व भुसार मालाचे व्यापारी असून, त्यांचे चार खोल्यांचे घर आहे. घरातील आई-वडील व हे दोघेजण समोरच्या एका खोलीत झोपलेले असताना चोरट्यांनी घराच्या पाठीमागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. व तीन खोल्यामधील वेगवेगळे कपाट तोडून त्यातील ८ ते १० तोळ्याचे सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत साडेपाच लाख रुपये) व रोख तीन हजार रुपये मिळून एकूण ५ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज पाण्याच्या जारमध्ये टाकून लांबवला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली असून, घरातील मंडळींना सकाळी झोपेतून उठल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वामी, पोलीस कर्मचारी बालाजी जाधव, चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी परभणी येथून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, श्वानाने घटनास्थळापासून इटोली मुख्य रस्त्यावरील एका शेतापर्यंत चोरट्यांचा माग काढला, त्यानंतर श्वान तेथेच घुटमळले. याप्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे शनिवारी मध्यरात्री पाथरी तालुक्यातील बांदरवाडा शिवारात 5 ते 6 दरोडेखोरांनी एका घरातील मंडळींना मारहाण करून त्या घरातील महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून पोबारा केला. या घटनेचा काहीच तपास लागलेला नसताना दुसऱ्याच दिवशी जिल्ह्यातील ही घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होत आहे. तर, दुसरीकडे मागच्या आठवड्यातच नवीन पोलीस अधीक्षक जयंत मीना हे रुजू झाले असून, या दोन्ही सलग घडलेल्या घटनांचा छडा लावण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.
हेही वाचा -'नीट'च्या निचांकी निकालाला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कारणीभूत; 'मेस्टा'च्या तायडेंचा आरोप