परभणी- साईबाबांच्या जन्मस्थळावरून देशभर वाद पेटला आहे. या वादात शिर्डीकरांनी कठोर भूमिका घेत, सोमवारी शिर्डी बंदची हाक दिली आहे. शिर्डीकरांना आतापर्यंत श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला देणाऱ्या पाथरीकरांनी देखील त्यांच्याच पद्धतीने उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. शिर्डी सोमवारी बंद राहणार असेल तर, आम्ही पाथरी देखील सोमवारी बंद ठेवू, त्यानंतर जिल्हा आणि मराठवाडासुद्धा बंद ठेवण्यात येईल, असा इशारा पाथरी येथील साईबाबा जन्मस्थळ मंदिर कृती समितीचे अध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिला आहे.
हेही वाचा -साई जन्मस्थळाच्या वादातून शिर्डीसह 25 गावांत रविवारपासून बेमूदत बंद!
साईबाबा यांचा जन्म पाथरीत झाल्याचे पाथरीकरांकडे 29 पुरावे आहेत. शिवाय पाथरी येथे 1978 ला साईबाबांची मूर्ती स्थापना होऊन त्यांच्या मंदिराचीदेखील उभारणी झालेली आहे. हे मंदिर त्यांच्या आई-वडिलांच्या जून्या घरावरच उभारण्यात आले आहे. शिवाय या घराच्या अर्धवट भिंती आणि इतर काही साहित्य याठिकाणी आजही पाहायला मिळते. शिवाय विविध धार्मिक ग्रंथांमध्येसुद्धा साईबाबांचा जन्म पाथरीत असल्याचा पुरावा आहे. तसेच शिर्डीकर यांनी देखील काही प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये पाथरीत साईबाबांचा जन्म झाल्याचा उल्लेख होता; परंतु आता शिर्डीकर उल्लेख पुसून टाकत असल्याचा आरोप आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केला आहे.