परभणी -सध्या मराठवाड्यात पडणारा पाऊस हा पूर्वमोसमीच आहे. 14 जूननंतर मराठवाड्यात मोसमी पावसाचे आगमन होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्ता होणाऱ्या पावसावर अवलंबून राहून पेरण्या करू नयेत, असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून केले जात आहे.
आत्ता पडणाऱ्या पावासावर अवलंबून राहून पेरण्या करू नयेत यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. हा पाऊस पूर्वमोसमी असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यानंतर सुमारे 8 दिवसांनी म्हणजेच काल मध्यरात्रीपासून परभणी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला आहे. हा पाऊस मोसमी असल्याचा समज अनेकांनी करून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकरी बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.
या संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाचे प्रमुख डॉ.कैलास डाखोरे यांना विचारले असता ते म्हणाले, 'कालपासून परभणी जिल्ह्यात जवळपास एक इंच पावसाची नोंद झाली आहे. परंतु, हा पाऊस मोसमी पाऊस नाही, तो पूर्वमोसमीच आहे. हवामान खात्याने मौसमी पावसाला मराठवाड्यात 14 जूननंतर सुरुवात असा अंदाज यापूर्वीच वर्तावला आहे. 14 जूननंतर जेव्हा प्रत्यक्ष मोसमी पावसाला सुरुवात होईल, तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करावी. या पावसावर अवलंबून राहून पेरण्या करू नयेत', असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.
अनेक वेळा शेतकरी एखाद-दुसऱ्या पावसावर पेरण्या करून मोकळा होतो. त्यानंतर मात्र, पावसात मोठा खंड पडतो. अशावेळी पेरलेले बियाणे आणि खत वाया जाते आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी दिलेला सल्ला ऐकून 14 जून नंतरच पेरण्या करणे योग्य ठरणार आहे.