परभणी -पाथरी तालुक्यातील मुदगल, वाघाळा, विटा, फुलारवाडी, कुभारी, वांगी, लिंबा या गावांना अद्यापही जायकवाडीच्या कॅनॉलचे पाणी मिळालेले नाही. दोन दिवसात पाणी शेवटपर्यंत पोहोचवा, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने शेतकऱयांनासोबत घेऊन जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात जायकवाडीच्या उपविभाग क्र. ६ च्या उप अभियंत्यास शुक्रवारी (१ मार्च) निवेदन दिले आहे. तालुक्यातील बी ५९ क्रमांकाच्या चारीला महिनाभरापासून पाणी सुरू आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे मुदगल, वाघाळा, फुलारवाडी, लिंबा, विटा, वांगी आणि कुंभारी या गावातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.
पहिल्या पाण्यावर पेरणी केलेल्या ज्वारीसाठी आता गरज असताना पाणी मिळत नसल्याने हे पीक हातचे जाणार आहे. पाऊस नसल्याने या भागातील शेतकऱयांनी पाटाच्या पाण्यावर शेती ओली करून पेरणी केली होती. याबरोबरच पाथरी तालुक्याच्या याभागात पर्जन्यमान कमी झाल्याने पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचेही मोठे संकट असून या वेळी या भागात पाणी न गेल्यास गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे वरील गावांना नियोजन करून पाणी सोडण्याची मागणी होत आहे.
दर वेळी जायकवाडी उपविभाग पाथरीकडून वरील गावांसाठी सवतासुभा केला जात असल्याची भावना शेतकरी वर्गातुन व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कार्तिक घुंबरे पाटील यांनी निवेदनाव्दारे आंदोलनाचा ईशार दिला आहे. या वेळी पंचायत समिती सदस्य अजय थोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू काळे आणि शेतकऱयांची उपस्थिती होती.