परभणी- जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या येलदरी धरणाचे सर्वच म्हणजे दहा दरवाजे उघडून तब्बल 44 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात केला जात आहे. ज्यामुळे पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. तर धरणाच्या पुढील बाजूस असलेल्या जिंतूर-सेनगाव महामार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने मराठवाड्यातून विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील कडसावंगी ते येसेगाव दरम्यानच्या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने त्या ठिकाणचा रस्ताच वाहून गेला आहे.
येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू परभणी जिल्ह्यात सरासरी 744.9 मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र, यंदा 21 सप्टेंबरच्या सकाळपर्यंतच 752 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जी की सरासरीच्या 101 टक्के एवढी आहे. मागच्या वर्षी याच दिवसापर्यंत केवळ 552 मिलिमीटर म्हणजे 77.7 टक्के पावसाची नोंद झाली होती. या वर्षी मात्र वरुणराजा परभणी जिल्ह्यावर मेहेरबान झाला असून, जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. एवढेच नव्हे तर येलदरी, दुधना या प्रकल्पा बरोबरच गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे दिग्रस आणि मुळी बंधारादेखील 100 टक्के भरला आहे.
हेही वाचा -चंद्रकांत पाटलांनी कंगना रणौतला दिला 'हा' सल्ला...
या धरणांमधून पुढे पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला आहे. ज्यामध्ये येलदरी धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडून तब्बल 44 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात केला जात आहे. त्यामुळे धरणाच्या पुढच्या बाजूला असलेला जिंतूर-सेनगाव हा महामार्ग ठप्प झाला आहे. या महामार्गावरील धरणापुढचा पूल पाण्याखाली गेला असून, आज (सोमवार) सकाळपासून दुपारनंतरही ही परिस्थिती कायम होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या. विशेष म्हणजे हा महामार्ग बंद झाल्याने मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एक रस्ता बंद झाला असून, विदर्भाशी संपर्क तुटला आहे.
येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू दरम्यान, येलदरी धरण 100 टक्के भरल्याने धरणाच्या विद्युत प्रकल्पातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. या विद्युत प्रकल्पातून आतापर्यंत 3 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची वीज निर्मिती करण्यात आली आहे. तसेच पूर्णा नदीच्या पात्रात सोडलेल्या पाण्यामुळे नांदेडच्या परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे मिटला आहे. तर दुसरीकडे जायकवाडी धरणातून एक लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. ज्यामुळे पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधारा, मुदगल आणि खडका तसेच पूर्णा तालुक्यातील दिग्रस बंधारा आणि गंगाखेड तालुक्यातील मूळी बंधारा देखील 100 टक्के भरला असून, या बंधार्याचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.
येलदरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू तसेच सेलू तालुक्यातील दुधना प्रकल्पातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, दुधना नदीला देखील काही भागांमध्ये पूर आला आहे. ज्यामुळे सेलू तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला. याप्रमाणेच जिंतूर तालुक्यातील कडसावंगी ते येसेगाव या दरम्यानचा रस्ताच शनिवारी रात्री ओढ्यास आलेल्या पुरामुळे अक्षरशः वाहून गेला आहे. त्याचा परिणाम या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. गेल्या दोन-चार दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचा परिणाम ओढ्यास मोठा पूर आला आहे. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून या ओढ्यावरील पुलाचे काम करावे, अशी मागणी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी सातत्याने केली. मात्र, त्यांची मागणी पूर्ण झाली नाही.