परभणी - शहरात गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने तत्काळ संचारबंदी लागू केली आहे. आजपासून (शुक्रवारी) तीन दिवस ही संचारबंदी असणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी सहा वाजल्यापासूनच पोलिसांनी शहरातील सर्व रस्ते, नगर, कॉलनीसह महामार्गावर तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांना रस्त्यांवर येण्याची मुभा असून विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईस तोंड द्यावे लागत आहे. ज्यामुळे संपूर्ण शहरात शुकशुकाट दिसत आहे.
अगदी सुरुवातीपासून परभणी जिल्हा कोरोनाच्या बाबतीत ग्रीन झोन मध्ये होता. शहराच्या तसेच जिल्ह्याच्या सीमा सर्वप्रथम बंद करणारा परभणी जिल्हा त्यामुळे या विषाणूपासून अलिप्त राहिला. मात्र गुरुवारी शहरातील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात 21 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आणि एकच खळबळ उडाली. यामुळे खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने परभणी महानगरपालिका क्षेत्रासह परिसरातील तीन किलोमीटर क्षेत्रात संचारबंदी लागू केली. त्यामुळे आज, उद्या आणि परवा अशी तीन दिवस संचारबंदी असणार आहे. या काळात कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केवळ अत्यावश्यक असलेल्या वैद्यकीय सेवा, स्वच्छता कर्मचाऱ्यांना रस्त्यावर येण्याची मुभा आहे.