परभणी - महाराष्ट्र राज्याचा कारभार अत्यंत बेशिस्तपणे चाललेला आहे. विकास किंवा जनसामान्यांना पुढे ठेवून कुठल्याही मंत्र्यांचे दौरे होत नाहीत, कुठलाही कार्यक्रम घेतल्या जात नाही. फक्त आणि फक्त तीन पार्ट्यांच्या लोकांना खूश ठेवून सत्ता कशी टिकवायची हेच त्यांचे ध्येय असल्याची टीका केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज (गुरूवार) परभणीत केली.
राज्याचा कारभार अत्यंत बेशिस्तपणे चाललाय - डॉ. कराड 'जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्यभर फिरतोय'
राज्यातील विविध भागांमध्ये केंद्रीय मंत्री जन आशीर्वाद दौरा करत आहेत. याअंतर्गत परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या 7 वर्षात काढलेल्या योजनांबद्दल लाभार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी व मोदींचा प्रतिनिधी म्हणून जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी राज्यभर फिरतोय, असे सांगितले. त्यांच्यासोबत आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, डॉ. सुभाष कदम व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
'कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन'
'भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळेल?', असा विरोधकांनी आरोप केला आहे. याविषयी ते म्हणाले, की कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करूनच आम्ही कार्यक्रम करत आहोत.
'परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रयत्न करणार'
'मी मराठवाड्याचा असल्याने मराठवाड्यातील सर्व प्रश्न मला माहित आहेत. परभणीला वैद्यकीय महाविद्यालय भेटले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. यासाठी राज्य सरकारने मंजुरी द्यावी आणि त्यासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या सर्व मंजुऱ्या मिळवून देण्याची जबाबदारी माझी असल्याचे कराड म्हणाले. तसेच मनमाड ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दोहेरीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे कराड यांनी यावेळी सांगितले.
'परभणीचे पालकत्व स्वीकारतो'
परभणी जिल्ह्यात सीसीआयची केंद्र बंद असल्याची माहिती मला मिळाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हे बंद सीसीआय सेंटर सुरू करणार आहे. परभणीचे पालकत्व मी स्वीकारतो. शिवाय 'मुद्रा'ची विशेष बैठक लावून तरुणांना कर्ज देण्यासाठी आदेश देणार आहे, असे कराड यावेळी म्हणाले.
'पीक विम्यासाठी डिजिटल सर्व्हे करणे गरजेचे'
पिक विम्यामध्ये राज्य सरकारकडून अत्यंत चुकीच्या पद्धतीने कामे झाली आहेत. राज्याकडून पीक विम्यासाठी प्रस्ताव केंद्राला पाठवणे गरजेचा आहे. राज्य सरकारने ज्या कंपनीला काम दिले आहे, त्यांच्याकडून चुकीचे सर्व्हे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात डिजिटल सर्व्हे करणे गरजेचे आहे, असे कराड यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाबाहेर मोठा बंदोबस्त, नारायण राणे घेणार का दर्शन?