परभणी -गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात फिरतो आहे. ही माझी जनयात्रा माझ्यासाठी तीर्थयात्रा आहे. लोकांना मंदिरात देव दिसतो, पण शिवसेनेसाठी जनता जनार्दन देव आहे. येणाऱ्या काळात राज्यातला दुष्काळ घालवायचा आहे. बेरोजगारी संपवायची आहे. महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी तसेच नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजेत, अशी भावनिक साथ आज (शुक्रवारी) गंगाखेड येथे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी घातली.
जनआशीर्वाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. गंगाखेड येथील एका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, मंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, सचिन अहिर, खासदार संजय जाधव, हेमंत पाटील, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सखुबाई लटपटे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, "यात्रा सुरू झाल्यापासून पावसाचे देखील आगमन झाले आहे. मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी पाऊस पडतो आहे. गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणारे शेतकरी यापुढे दुष्काळ पाहणार नाहीत, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपल्याला स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे. नवीन महाराष्ट्रात बेरोजगारी राहणार नाही, राज्याला सुजलाम-सुफलाम करायचे आहे, यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. शेतकर्यांना कर्ज मुक्त करायचे आहे. त्यांच्यासह जनतेला कुठलाही त्रास होणार नाही, असे काम करण्यासाठी मला आशीर्वाद हवे आहेत." असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तत्पूर्वी खासदार संजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. हा संवाद कार्यक्रम संपल्यानंतर आदित्य ठाकरे पुढील नियोजित पोखर्णी, पाथरी आणि सेलूसह मानवत येथे होणाऱ्या कार्यक्रमांकडे रवाना झाले.
आदित्य ठाकरे यांची यात्रा सात तास उशिराने धावते आहे
दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा आशीर्वाद दौरा ७ तास उशिराने धावत आहे. नांदेड येथून सकाळी निघाल्यानंतर ठिकठिकाणी लोकांची निवेदन घेणे, त्यांचे सत्कार स्वीकारणे, या कार्यक्रमांमुळे पालम येथे सकाळी ११ रोजी ते सायंकाळी ६ वाजता दाखल झाले. त्यानंतर ७ वाजता त्यांचा ताफा गंगाखेड येथे पोहोचला. यानंतर पुढे त्यांचे चार कार्यक्रम आहेत. दरम्यान त्यांच्या उशिरा येण्याने अनेक ठिकाणी शेतकरी, सामान्य, नागरिक आणि शिवसैनिक ताटकळत आहेत.