परभणी - लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या एकूण २७ उमेदवारांच्या ३८ अर्जांपैकी ६ अर्ज नामंजूर झाले आहेत. विशेष म्हणजे आज एका उमेदवाराने आपला अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे आता परभणीच्या लोकसभा निवडणूक रिंगणात २० उमेदवार शिल्लक असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी दिली आहे.
परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी मुख्य निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार सिंग, जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, अप्पर जिल्हाधिकारी विशंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आदी उपस्थित होते. परभणी मतदार संघासाठी काल, मंगळवारी (२६ मार्च) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. त्यानुसार कालपर्यंत २७ उमेदवारांनी ३८ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. आज (गुरुवारी) या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये ६ अर्ज विविध त्रुटीमुळे नामंजूर झाले आहेत. तसेच २७ पैकी एका उमेदवाराने आजच आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे २० उमेदवार परभणीच्या निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत.