परभणी - जिल्ह्यातील सेलू येथे मंगळवारी (दि. 12 मे) क्षमतेपेक्षा जास्त कापूस भरुन निघालेल्या ट्रकमधील कापसाला विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने दहा क्विंटल कापूस जळून खाक झाला होता. त्यानंतर आज बुधवारी (दि. 13 मे) लागलीच दुसऱ्या दिवशी पाथरी येथील एका जिनिंगमध्ये नेण्यात येत असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधील कापसाला देखील उच्चदाब असलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श झाला. यात 40 क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.
जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांचा कापूस लॉकडाऊनमुळे घरातच अडकून पडला आहे. चार महिन्यांपासून शेतकऱ्यांनी कापूस वेचून घरात गोळा करुन ठेवला आहे. भाव आल्यानंतर विक्रीच्या उद्देशाने थांबलेल्या लोकांपुढे लॉकडाऊनमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतेच ऑनलाईन नोंदणी करुन जिल्हाभरातील विविध जिनिंगवर फेडरेशनच्या माध्यमातून कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र कापसाचे ट्रक, ट्रॅक्टर आणि टेम्पोची वाहतूक दिसून येत. महिनाभरापूर्वी परभणीच्या उड्डाणपुलावर ट्रकमध्ये भरलेल्या कापसाला अशीच आग लागली होती. दोन दिवसात अशा दोन घटना घडल्या आहे.