परभणी - जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 19 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे गेल्या 24 तासांत एकूण 27 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तर याबरोबरच जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 181 वर पोहोचली आहे.
बुधवारी परभणी शहरातील 8 आणि तालुक्यातील 3 असे एकूण 11 रुग्ण आढळून आले. तर गंगाखेड तालुक्यात 10 आणि मानवत येथे 2, पाथरी शहरात तसेच सेलू तालुक्यात प्रत्येकी एक रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. दुपारपर्यंत 8 रुग्ण आढळून आले होते. त्यात या 19 रुग्णांची भर पडल्याने 24 तासांत एकूण 27 रुग्णांची नोंद करण्यात आली.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सेलू आणि गंगाखेड येथे 3 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात आता एकूण बाधितांची संख्या 181 झाली आहे. यातील चार जणांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. तर 107 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 70 आणि सेलू येथील मुंबईत तपासणीसाठी चाचणी देणाऱ्या 2 जणांसह एकूण 72 कोरोना बाधितांवर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना संक्रमित कक्षात उपचार सुरू आहेत.