पालघर- मित्रांनी, नग्न अवस्थेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने वाणगाव रेल्वे स्टेशन पाडा येथे रहाणाऱ्या एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल मिश्रा (वय 24), असे या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
वाणगाव येथे राहणारा राहुल मिश्रा (वय 24) हा तरुण बोईसर उद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्स या कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होता. बोईसर शिवाजीनगर येथे तो आणि त्याचे दोन मित्र फ्लॅट घेऊन भाड्याने राहत होते. नेहमीप्रमाणे राहुल रात्री 8 वाजताच्या सुमारास कामावरून आपल्या शिवाजीनगर येथील घरी आल्यानंतर झोपला. त्यावेळी त्याच्यासोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांनी राहुलला विवस्त्र करून त्या अवस्थेतील फोटो व चित्रिकरण केले. ही घटना राहुलला समजताच त्याने ते फोटो व चित्रीकरण डिलिट करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांना विनवणी केली. मात्र, रूम सहकाऱ्यांनी ते फोटो व चित्रीकरण डिलीट करण्यास नकार दिला व त्याच्याकडून 4 हजार रुपयांची मागणी केली. "जर तू पैसे दिले नाहीस तर आम्ही हे फोटो फेसबुक व इतर समाज माध्यमांमध्ये वायरल करु अशी धमकीही राहुल याला दिली.