पालघर - गावचा पोलीस पाटील सातत्याने अश्लिल शिवीगाळ करतो, म्हणून गावातील महिलांनी त्याला अर्धनग्न करुन मारहाण केली. ही घटना तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव येथे शनिवारी घडली. या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, समाज माध्यमांवर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
महिलांना शिवीगाळ करणाऱ्या पोलीस पाटलाला अर्धनग्न करुन मारहाण
महाराष्ट्र गुजरात सीमेलगत पश्चिम रेल्वेच्या बोर्डी रोड रेल्वे स्थानकानजीक बोरिगाव हे गाव आहे. येथील मोरेपाडा या पाड्यावरील आदिवासी महिलांना येथील पोलीस पाटील अनेक दिवसांपासून अश्लिल शिवीगाळ करत असल्याची महिलांची तक्रार आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून पाड्यावरच्या आदिवासी महिला अस्वस्थ होत्या. शनिवारी सकाळी पोलीस पाटील पाड्यावर आला आणि त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यावेळी या महिला एकत्रित आल्या आणि चक्क त्याच्या अंगावरील कपडे उतरवण्यास प्रारंभ केला. मात्र याही परिस्थितीत तो महिलेची नावे घेऊन, पुटपुटत होता. अर्धनग्न झाल्यावरही त्याच्या कृतीत कोणताच फरक जाणवत नव्हता. शेवटी महिलांशी असभ्य वर्तन केल्यास आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्याला सांगण्यात आल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
या घटनेचा व्हिडिओ मोबाईलद्वारे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होत आहे. ग्राम प्रशासन आणि शासन या मधला दुवा म्हणून पोलीस पाटील गावपातळीवर काम करत असतो. येथे मात्र, या पदावरील व्यक्तीने आदिवासी महिलांना त्रास दिल्याने आदिवासींच्या विविध संघटना सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डहाणू प्रांताधिकारी आणि उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.