पालघर -वाडा पंचायत समिती सभापतींच्या गाडी अपघात झाला आहे. या अपघातात सभापती बचावले आहेत. चार महिन्यांपासून सभापतींच्या गाडीला ड्रायव्हर नाही. त्यामुळे सभापतींच्या गाडीवर शिपाईच ड्रायव्हर म्हणून गाडी चालवत आहे. या अपघातानंतर पंचायत समितीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे.
वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके पालघर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपवून वाडा येथे परतत होत्या. यावेळी पालघर रोडवरील वाघोबा खिंडीजवळ ट्रक (नंबर MH 48-AG 2520) आणि सभापतींच्या सुमो गाडीचा अपघात झाला. 12 जूनला सायंकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके व शिपाई चालक सुदैवाने बचावले.
वाडा पंचायत समितीच्या सभापतींना जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी व इतरत्र मिटींग करता शासकीय वाहन देण्यात आले आहे. 1 जानेवारी 2019 ला या गाडी वर कंत्राटी चालकाने राजीनामा दिला. त्यानंतर या वाहनाला चार महिन्यांपासून चालक नियुक्त करण्यात आलेला नाही. गाडीवर चालक देण्याची मागणी वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके या गटविकास अधिकाऱ्यांकडे करत आहेत. त्यांनी तसा पत्रव्यवहार 04 जानेवारी 2019 पंचायत समितीकडून पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केला आहे. मात्र, लोकसभेचा आचारसंहिता काळ संपला तरी अद्याप चालकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. चालक नेमणूक करण्याची मागणी होत असताना एवढा विलंब का होतोय? असा प्रश्न सभापती अश्विनी शेळके यांनी उपस्थित केला आहे. यामुळे पंचायत समितीच्या शिपायाला गाडी चालवावी लागत आहे. गाडीच्या चालकासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव 4 जानेवारीला पाठवल्याचे गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे यांनी सांगितले.
या अपघातामुळे वाडा पंचायत समितीचा हलगर्जीपणा समोर आला आहे. चालक नेमणूकीबाबतची चालढकल पंचायत सभापती व शिपाई याच्या जिवावर बेतली असती.