वसई - विरार पश्चिमेच्या डी-मार्टमध्ये बॉम्ब असल्याचा आणि दहशतवादी पकडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे फक्त पोलिसांचे 'मॉकड्रिल ऑपरेशन' असल्याचेही सांगण्यात आले.
विरारच्या डी-मार्टमध्ये दहशतवादी पकडल्याची अफवा
ही केवळ अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच हे फक्त पोलिसांचे 'मॉकड्रिल ऑपरेशन' असल्याचेही सांगण्यात आले.
गुरुवारी सायंकाळपासून वसई विरारमध्ये सोशल मीडियावर विरार येथील डी-मार्टमध्ये दहशतवादी पकडल्याची माहिती व्हायरल होत होती. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. डी-मार्टमध्ये झालेली ही घटना कोणतीही कारवाई नसून अर्नाळा पोलिसांचे मॉकड्रील ऑपरेशन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये एखाद्या आरोपीला कशाप्रकारे अटक केली जाते, त्याच्यावर पोलीस कारवाई कशी केली जाते, तसेच एखाद्या प्रकरणात पोलीस किती तत्परता दाखवते याबाबतचे प्रात्यक्षिक करण्यात येते. मात्र, पोलिसांच्या या प्रात्यक्षिकांचा काही व्यक्तींनी व्हिडिओ बनवून अफवा पसरवण्याचे काम केले आहे. यात काहींनी बॉम्ब, तर काहींनी दहशतवादी पकडल्याचे मॅसेज पसरवले. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.