वसई(पालघर) - वसई-विरार शहर महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असताना नायगाव परिसरातील शाळांनी मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांकडे शुल्क भरणा करण्यासंदर्भात तगादा लावला आहे. याबाबत आम्ही नायगावकर संस्थेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे शुल्क माफीची मागणी केली आहे.
आम्ही नायगावकर संस्थेचे संस्थापक चेतन घरत आणि महिला कार्यकर्त्या श्रद्धा चेतन घरत यांनी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. नायगाव परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे, अशी मागणी केली. कोरोना व टाळेबंदीमुळे उद्भवलेल्या पालकांच्या गंभीर आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार सरकारने करावा, अशी त्यांनी विनंतीही केली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळात पुनिर्णय घेवू, असे आश्वासन दिले आहे.