वसई (पालघर) - कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होऊ लागल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ही अनलॉक प्रक्रिया पालघर जिल्ह्यातही सुरू करावी, अशी मागणी बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी ठाकूर यांनी लसींचा तुटवडा, वसईतील लोकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यासंदर्भातील आदी मागण्यांवर चर्चा केली.
दुकानदारांना वेळेत सुट द्यावी -
सरकारने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील दुकाने रात्री १० वाजतापर्यंत उघडी ठेवण्याची मुभा दिली आहे. सरकारने कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटचा विचार करून शहरांची विभागणी चार स्तरांमध्ये केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर ही शहरे दुसऱ्या स्तरात मोडतात. त्यामुळे येथे रात्री १० वाजतापर्यंत दुकाने उघडी राहू शकतात. पण शेजारीच असलेला पालघर जिल्हा मात्र तिसऱ्या स्तरात येतो. पण येथील दुकानदारांनाही रात्री १० वाजतापर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची सूट द्यावी, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी केली आहे.
वसई-विरार महापालिकेत पॉझिटीव्हिटी रेट २.०७ टक्के एवढा कमी आहे. गेली दोन वर्षं या भागातील व्यापारी, दुकानदारांचे व्यवसाय बंद असल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या सर्वांच्या कुटुंबियांची परिस्थितीही बिकट आहे, अशी वस्तूस्थिती क्षितीज ठाकूर यांनी टोपे यांच्य पुढे मांडली.
हेही वाचा -'.... यापेक्षा गाणे गाण्याकडे लक्ष द्या'; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना सल्ला