पालघर - चिंचणी समुद्रकिनारी मद्यपी पर्यटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समुद्रकिनारी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस गेले असता, तीन पर्यटकांनी पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.
मद्यपी पर्यटकांचा धिंगाणा; पोलिसांवरच हल्ला-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात सध्या पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी आहे. मात्र, रविवारची सुट्टी असल्याने चिंचणी बीचवर मुंबई येथून काही पर्यटक फिरण्यासाठी आले होते. हे पर्यटक मद्य प्राशन करुन धिंगाणा घालत असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी धिंगाणा घालणाऱ्या या मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यावेळी मद्यपी पर्यटकांनी पोलिसांबरोबर हुज्जत घालून धक्काबुक्की करत हल्ला केल्याचा प्रकार घडला, हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात देखील कैद झाला आहे. पर्यटकांनी आपली गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला जात आहे.