पालघर- जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाबरोबरच मध्यरात्रीपासून वारेही वाहत होते. सतत पडत असलेल्या पऊस व वाऱ्यामुळे पालघर नजीक गोठणपूर येथे पहाटे 5.30च्या सुमारास एक घर पुर्णपणे खाली कोसळले. तसेच दोन घरांवर झाड कोसळले आहे. या घटनेत तिन्ही घरांचे मोठे नुकसान झाले असून एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे.
गोठणपूर येथील रहिवासी सुभाष सखाराम रिंजड हे आपल्या परिवारासह गौरीसाठी आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे त्यांचे संपूर्ण घर खाली कोसळले. घरातील सर्व सदस्य बाहेर असल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून मालमत्तेचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. रुपाली सखाराम रिंजड, रामदास गणपत रिंजड यांच्या घरावर झाड कोसळले आहे. रुपाली या वृद्ध महिला घरात झोपल्या असताना त्यांच्या घरावर झाड कोसळल्याने त्यांच्या खांद्यावर पत्रा पडला व त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. रुपाली व रामदास रिंजड यांच्या घरांवर झाड कोसळल्याने त्यांच्या घराचेही मोठे नुकसान झाले आहे.