पालघर - पावसाळा तोंडावर आल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने सुक्या मासळीच्या खरेदीला प्राध्यान दिले जाते. ग्रामीण भागातल्या आठवडी बाजारात सध्या वाड्या-पाड्यावरील आदीवासी नागरिकांची मासळी खरेदीसाठी गर्दी होताना दिसून येत आहे. परिणामी मासळी विक्रेत्यांचा धंदाही तेजीत आहे.
दुर्गम भागात मान्सूनपूर्व खरेदीसाठी लगबग
जव्हार, मोखाडा, तलवाडामधील मच्छीमार समाजाबरोबर सातपाटी, डहाणू, वसई, केळवे भागातील मासळी विक्रेत्या महिला विविध ठिकाणच्या आठवडी बाजारात आपले दुकान थाटतात.
सुकी मासळी ग्रामीण आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. मात्र, पावसाळा सुरू झाला की मासेमारी व्यवसाय बंद होतो. ताजी मासळी बाजारात उपलब्ध होत नाही. यावेळी सगळ्या खवय्यांचा भर सुक्या मासळीवर असतो, त्यामुळे सुकी मासळीची साठवण ग्रामस्थ करततात. बोंबील, सुकट, कोलीम मांदेली, बागडे, जवळा, करंदी अशा विविध प्रकारच्या सुक्या मासळीचा यात समावेश असतो.
दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मासळीचे भाव वाढले आहेत. पूर्वी शंभर रुपये दराने मिळणारे सुके बोंबील आता दोनशे ते अडीशे रुपयांनी शेकडा विकले जाते. एकंदरीत सुकी मासळी ग्रामीण आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे दर वाढले असले तरी सुक्या मासळीची खरेदी कमी झालेली दिसत नाही.