पालघर (वाडा)- तानसा आणि मोडक सागर ही धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. यामुळे तानसा आणि वैतरणा या नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. पावसाची आणि धरणाच्या जलसाठ्याची पातळी पाहता धरण काही काळात ओसंडून वाहणार असल्याने मुंबई महापालिकेने ठाणे व पालघर जिल्हा प्रशासनाला 15 जुलैला पत्रक काढून नदीकाठावरील गावांना सावधगिरीचा इशारा देण्यासोबत उपाययोजनांबाबत सुचविले आहे.
तानसा येथील तानसा धरणाची 15 जुलैला दुपारी 12 वाजेपर्यंत पाण्याची पातळी 126.781 मीटर्स टिएचडी ( 415.95 फुट टिएचडी ) आहे. तर जलसाठ्याची 128.62 मीटर्स टिएचडी (422.00 फुट टिएचडी) आहे.
शहापूर तालुक्यातील खर्डी येथील मोडकसागर (वैतरणा) धरणाची जलसाठ्याची पातळी 15 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत 160.842 मीटर्स टिएचडी (527.70 फुट टिएचडी) तर 163.147 मीटर्स टिएचडी (535.26 फुट टिएचडी) एवढी आहे.
पावसाची स्थिती कायम राहिल्यास जलसाठ्याच्या पातळीत वाढ होऊन ही धरणे ओसंडून वाहू शकतात. त्यामुळे तानसा आणि वैतरणा नदीकाठी असलेल्या वाडा, शहापूर, भिवंडी आणि वसई या तालुक्यातील गावांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
वैतरणा नदी काठी वाडा तालुक्यातील दाढरे, शेले,तिळसे, गांधरे, बोरांडे या सारखी वाडा आणि पालघर तालुक्यातील मिळून एकुण 42 गावे आहेत. तानसा नदीकाठी शहापूरमधील 8, वाडा 4, भिवंडी 10 आणि वसई 9 अशी एकूण 33 गावे आहेत. या गावांना सावधगिरीचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.