विरार (पालघर)- वसई-विरार महापालिका हद्दीत कोरोनाग्रस्त व संशयित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या अलगीकरण व विलगीकरण कक्षातील अनेक सफाई कर्मचारी गैरहजर राहत असल्याची बाब पालिका आयुक्तांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी बैठक घेत 6 कायम सफाई कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करुन त्यांची विभागील चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. तसेच 9 ठेका मजुरांना कामातून मुक्त करण्याचे आदेश दिले आहे.
वसई विरार महानगरपालिकेतील गैरहजर कर्मचाऱ्यांवर आयुक्तांची कारवाई - vasai virar municipal corporation news
कोरोनाच्या पार्शभूमीवर उभारण्यात आलेल्या अलगीकरण व विलगीकरण कक्षातील सफाई कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याची बाब वसई-विरार पालिका आयुक्तांच्या लक्षात आली. त्यानंतर त्यांनी 6 कायम सफाई कर्मचाऱ्यांचे निलंबन केले तर 9 ठेका कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे.
अलगीकरण व विलगीकरण कक्षातील अनेक कर्मचारी रजेचे अर्ज न करता परस्पर गैरहजर राहत होते. यामुळे तेथील रुग्णांचे व विलगीकरण कक्षातील संयशितांची गैरसोय होत होती. त्यामुळे निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच बेजबाबदारपणा बद्दल 1 वरिष्ठ स्वछता निरीक्षक, 1 लिपिक तथा प्रभारी स्वछता निरीक्षक व 1 मुकादम यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. तसेच जे कर्मचारी आजारपणाचे कारण देऊन गैरहजर राहिले आहेत. त्यांची वैद्यकीय मंडळाकडून ते सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहेत का याची तपासणी करून घेण्याचे आदेशही आयुक्त यांनी संबंधित विभागास दिले आहेत.