पालघर - एकाच मंडपात दोन वधूंशी लग्न ऐकल्यावर कुणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. मात्र, हे खरे आहे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वसा, सुतारपाडा येथे राहणाऱ्या संजय धाडगा यांचा एकाच मंडपात २ वधूंशी येत्या २२ एप्रिलला विवाहसोहळा पार पडणार आहे. पेशाने रिक्षा चालक असलेल्या संजय आपल्या २ जीवन संगिनी सोबत विवाहबंधनात अडकणार आहे. २२ तारखेला हा विवाह सोहळा एकाच मंडपात पार पडणार असून, या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी घरासमोरील आवरात तयारीही सुरू झाली आहे.
वर संजय धाडगा आणि वधू बेबी व रीना, अशी नावे असलेली लग्नपत्रिका सध्या समाज माध्यमांत वायरल झाली आहे. त्यानंतर एकाच मंडपात दोन वधूंशी होणाऱ्या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या संजयने रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह सुरू केला अन् १० वर्षांपूर्वी बेबी नावाच्या मुलीशी त्याचे सूत जुळले. त्यानंतर हे दोघे एकत्र घरात राहून संसार हाकू लागले, त्यातच रिक्षा चालक म्हणून कार्यरत असतानाच ८ वर्षांपूर्वी रिना नावाच्या मुलींवर त्याचे प्रेम जडले. त्यानंतर बेबी आणि रीना या दोघी संजयबरोबर एकाच घरात राजीखुशी लग्न न करताच संसार करू लागल्या. सध्या बेबीला एक मुलगा आणि मुलगी तर, रिनाला एक मुलगी आहे. ही तिनही मुले शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.