पालघर - शिवसेनेच्यावतीने राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या जयघोषाला विरोध केल्याने पालघर शिवसेनेच्या वतीने भाजप व व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नायडू यांनी केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
व्यकंय्या नायडूंविरोधात पालघरमध्ये शिवसेनेचे आंदोलन - व्यंकय्या नायडू बातमी
पालघरमध्ये शिवसेनेच्या वतीने राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नायडू यांनी जाहीर माफी मागावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी (दि. 22 जुलै) दिल्लीतील राज्यसभा सभागृहात पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणा दिली. यावर सभापती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त केली. हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नसून माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या घोषणा रेकॉर्डवर घेतल्या जाणार नाहीत. सभागृहात कोणत्याही घोषणा देण्यास परवानगी नाही. भविष्यात हे लक्षात ठेवा, अशी समज यावेळी व्यंकय्या नायडू यांनी दिली होती.
या प्रकरणाचा सध्या राज्यात जोरदार निषेध करण्यात येत आहे. शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत असून व्यंकय्या नायडू यांनी शिवरायांचा अपमान केला आहे. यांच्या वक्तव्याने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. देशाच्या उच्चपदी विराजमान असलेल्या नेत्यांकडून झालेला हा अवमान खेदजनक असल्याचे म्हणत भाजप व नायडूंनी याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.