पालघर -राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे मुंबई येथील कोकिलाबेन या रुग्णालयात वयाच्या 70 वर्षी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर वाडा येथील सिध्देश्वर घाट येथे दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यविधीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विष्णू सावरा यांचा परिचय...
विष्णू रामा सवरा यांचा जन्म पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गालतरे या गावतला. ते स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीला होते. त्यांनी ही नोकरी १९८० साली सोडली. त्यानंतर त्यांनी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. १९८० च्या निवडणुकीत त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. पण या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला. यानंतर ते १९८५ च्या निवडणुकीत उभे राहिले. यातही त्यांचा पराभव झाला. पण यानंतर १९९० च्या विधानसभा निवडणुकीत विष्णू सावरा यांनी विजय मिळवला. मग सलग सहा टर्म (१९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४) विष्णू सावरा हे आमदार म्हणून निवडून आले.