पालघर- डहाणू येथील वेदांता मेडिकल आणि रिसर्च सेंटर येथे आरटी-पीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालघरचे खासदार राजेंद्र गावित आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते आरटी-पीसीआर लॅबचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी अशिमा मित्तल, तसेच तहसीलदार राहुल सारंग उपस्थित होते.
एक विशेषज्ञ व चार प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यामार्फत या लॅबमध्ये सुरवातीला दिवसागणिक ४० ते ५० चाचण्या करणे शक्य झाले आहे. परंतु, कालांतराने या क्षमतेमध्ये वाढ करण्यात येईल, अशी माहिती वेदांता हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. चतुर्वेदी यांनी दिली. जिल्ह्यातून कोरोना तपासणीसाठी घेण्यात आलेले घशाचे नमुने तपासणीसाठी मुंबईत पाठवले जातात. यामुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यासाठी तीन ते चार दिवसाचा कालावधी लागतो. मात्र, आता कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध झाली आहे. आरटी-पीसीआरमुळे कोरोना तपासणी अहवाल प्राप्त होण्याचा कालावधी कमी होणार आहे.