पालघर- जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या गणेश दामू भोर यांचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गणेश भोर हे 70 टक्के भाजले होते. त्यांच्यावर पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर मुंबई येथे हलविण्यात होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
नालासोपारा सेंट्रल पार्क येथील रहिवासी गणेश दामू भोर या रिक्षाचालकाने नालासोपारा येथे एका बिल्डरकडून सदनिका विकत घेतली होती. त्या मोबदल्यात त्याने 8 लाख रुपये बिल्डरला दिले होते. मात्र, बिल्डरने सदनिकेचा ताबा न देता ही सदनिका परस्पर दुसऱ्याला विकली. याप्रकरणी गणेश दामू भोर यांनी अनेकवेळा पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी त्यांच्या फसवणुकीबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी गणेश भोर यांनी न्यायालयाकडेही दाद मागितली होती. न्यायालयाने ही रक्कम त्याला देण्याचा आदेश दिला होता. त्याप्रमाणे 6 लाख रुपये बिल्डरने गणेश यांना डिमांड ड्राफ्टने दिले. मात्र, उर्वरित 2 लाख मिळत नसल्याने गणेश हताश झाले होते. वारंवार पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही त्यांना हे पैसे प्राप्त होत नव्हते.