पालघर -जिल्ह्यात (वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून) मागील काही दिवसांपासून करोनाग्रस्तांच्या संख्येत होत असलेली मोठी वाढ लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कठोर पाउले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले असून येत्या 5 एप्रिलपासून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स, हातगाडी व ठेल्यांवरील खाद्य पदार्थ विके्रत्यांसह अनेक बाबींवर वेळेचे व नागरीक क्षमतेचे निर्बंध लादण्यात आले आहे.
पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी चर्चा होऊन याबाबत रुपरेषा निश्चित करण्यात आली. त्यानुसार येत्या 5 एप्रिलपासून विविध बाबींवर निर्बंध लागल्याचे निर्देश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.
पाच एप्रिलपासून शाळा महाविद्यालयेही बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील 10 वी व 12 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या संमतीने उपस्थिती ऐच्छिक राहील. तसेच या संस्थांद्वारे ऑनलाइन स्वरुपात कामकाज सुरू ठेवता येईल. राष्ट्रीय, राज्य, विद्यापीठ, शासन किंवा शिक्षण मंडळ स्तरावरील यापूर्वीच घोषित झालेल्या परीक्षा कोरोना विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी
जिल्ह्यातील सर्व दुकाने 5 एप्रिलपासून सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहतील. मात्र, हे निर्बंध अत्यावश्यक सेवा, मनुष्य व प्राणीमात्रांसाठी जिवनावश्यक वस्तू, दूध, पेट्रोल पंप व औषधांच्या दुकानांना लागू राहणार नाही. खाद्यगृहे व बारमध्ये ग्राहकांचे आगमन व निर्गमन नियंत्रित करण्यात आले आहे. तसेच ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ सेवन करण्यासाठी टेबलाची व्यवस्था असते, अशीच खाद्यगृहे व बार सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत सूरु राहतील. होम डिलिव्हरीचे किचन रात्री 10 वाजेपर्यंत सूरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. तर हातगाडी, ठेले व स्टॉल ज्यावर खाद्य पदार्थ सेवन केले जाते व वितरण केले जाते, अशी ठिकाणे सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या कालावधीतच कोविडचे सर्व नियम पाळून सुरु राहतील. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींनाच उपस्थिती बंधनकारक राहील. प्रवेश देताना प्रत्येक व्यक्तीस विना मास्क प्रवेश देण्यास मनाई असेल, अशा ठिकाणी प्रवेश द्वारावरच थर्मल स्क्रिनिंग करणे बंधनकारक राहील.
लग्न समारंभ, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांवर निर्बंध
15 एप्रिलपर्यंत पूर्वनियोजित असलेल्या लग्न व इतर समारंभांच्या बाबतीत स्थानिक प्रशासन व संबंधित पोलीस ठाण्याकडून परवानगी घेऊन कोरोनाच्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आयोजित करण्यास परवानगी असणार आहे. 15 एप्रिलनंतर मात्र लॉन्स, मंगल कार्यालये, हॉल्स व तत्सम ठिकाणी लग्न व इतर समारंभ आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अत्यंविधी कार्यक्रमामध्ये देखील 20 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. व्यायामशाळा, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तीक सरावासाठी सुरू राहतील तर सामूहिक स्पर्धा व इतर कार्यक्रम बंद राहतील. सर्व प्रकारच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे देखील संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील.
हेही वाचा -नांदगावात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई