पालघर - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रांपैकी तीन ठिकाणी शिथिलता देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना शेतीची व मान्सूनपूर्व तयारीची कामे करण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीना प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी काही प्रमाणात शिथिलता दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशात म्हटले आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता
पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील बारा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. त्यापैकी सफाळे, उसरणी व काटाळे या गावांमधील ही क्षेत्राची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे.
पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील बारा ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. त्यापैकी सफाळे, उसरणी व काटाळे या गावांमधील ही क्षेत्राची मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील क्षेत्रांची पाहणी आरोग्य विभागाने केली असून येत्या काही दिवसात डहाणूमधील प्रतिबंधित क्षेत्रातील मर्यादा कमी होण्याची शक्यता आहे.१ एप्रिलपासून उसरणी येथे जाहीर झालेल्या प्रतिबंधित क्षेत्रामधून दांडा व खटाळी गावांना वगळण्यात आले आहे. तसेच सफाळा येथील तीन किलोमीटर पट्टय़ात असलेले प्रतिबंधित क्षेत्र सफाळे डोंगरीपाडा, कर्दळ पेट्रोल पंप समोरचा भाग तसेच मिरानगर जवळची एक इमारत व झोपडपट्टी परिसर असा मर्यादित करण्यात आला आहे.
तरीही सफाळे येथे वरई, पारगाव, चहाडे, तांदुवाडी व दहिसरतर्फे मनोर या भागातून येणाऱ्या वाहन व मनुष्य रहदारीवरील प्रतिबंध कायम ठेवण्यात आले आहेत. पालघर तालुक्यातील काटाळे व खारशेत गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र कायम राहणार असले तरी लोवरे, वाकडी, वसरोली, वांदिवली, मासवण व निहे या लगतच्या गावांना प्रतिबंधित क्षेत्रामधून वगळण्यात आले आहे.