पालघर -तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात वसईतील न्यू लाईफ केअर फाऊंडेशन या वृद्धाश्रमाचे अतोनात नुकसान झाले असून, या वृद्धाश्रमाला मोठ्या प्रमाणात मदतीचा हात विविध माध्यमांतून देण्यात येत आहे. शुक्रवारी पालघर लोकसभा क्षेत्राचे खासदार राजेंद्र गावित यांनी या वृद्धाश्रमाला भेट देत नुकसानीचा आढावा घेत येथील वृद्धांची आस्थेने विचारपूस केली.
दहा लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देणार - राजेंद्र गावित
तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्याला बसला आहे. या वादळात वसई येथील न्यू लाईफ केअर फाऊंडेशन या वृद्धाश्रमाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या वृद्धाश्रमाच्या डागडूजीसाठी दहा लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती खासदार गावित यांनी दिली आहे. यावेळी वसई विधानसभा समन्वय हरिश्चंद्र पाटील, शिवसेनेचे कार्यकर्ते पंकज देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी वृद्धाश्रमाच्या आश्रयाला असलेल्या सर्व 29 वृद्धांची विचारपूस केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बालपणीच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचीही त्यांनी भेट घेतली.
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट - एसटीच्या १३०० सुरक्षा रक्षकांना मिळणार थकीत वेतन