मोखाडा (पालघर) Raid On Drug Factory : राज्यात नाशिक, सोलापूर आणि संभाजीनगर नंतर आता पालघर जिल्ह्यातही ड्रग्जचा कारखाना असल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कावळपाडा गावानजीक एका फार्म हाऊसवर मिरा भाईंदर मधील गुन्हे शाखेच्या एका टीमने छापा टाकला. दरम्यान येथे 36 कोटी 90 लाख 74 हजार रुपयांचे ड्रग्ज व ड्रग्ज बनवण्यासाठीचे साहित्य जप्त केल्याचे समोर आले आहे. या कारवाईत अतिशय गुप्तता पाळल्यामुळे नेमके किती किमतीचे ड्रग्ज, साहित्य होते. तसंच यातील प्रमुख आरोपी कोण याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या कारवाईनंतर आता नाशिक ड्रग्ज प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का? असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. (Farm Houser Drug Manufacturing Factory)
आरोपीने सांगितला ड्रग्जच्या कारखान्याचा पत्ता :याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज संबंधी काही आरोपींना मिरा भाईंदर मधील काशिमीरा गुन्हे शाखेने अटक केली. यानंतर तपासात वसई मधील एका प्रमुख आरोपीला अटक करण्यात आली. पुढे सदरचे ड्रग्ज नेमके कुठून उपलब्ध झाले याबाबत अधिक तपास केला. यामध्ये आरोपीने मोखाडा तालुक्यातील या फार्म हाऊसवर ड्रग्ज बनावण्यात येत असल्याचं सांगितलं. नंतर अतिशय गोपनीय पद्धतीने तपासी टीमने या फार्म हाऊसवर आरोपीसाहित कारवाईला सुरुवात केली. यावेळी रात्री उशिरा पर्यंत ड्रग्ज बनवण्याचे साहित्य त्याच प्रमाणे काही प्रमाणात ड्रग्जही हस्तगत केल्याची माहिती आहे.